एका वैशिष्ट्यपूर्ण ग्रुपचा वैशिष्ट्यपूर्ण प्रवास. अरुणाचल प्रदेश आणि तवांग फेस्टिव्हल २०१९

आमच्या सामाजिक संपर्कातील Rushikesh Kakade यांनी Ultimate hikers and travellers यांच्या ‘एक दिवाळी सैनिकांसोबत’ या उपक्रमाला उपस्थित राहून अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर लिहलेला एक भन्नाट असा ब्लॉग. वाचा संपूर्ण ब्लॉग आणि आपले बहुमूल्य अभिप्राय नक्की कळवा.

डोंगराच्या कुशीत आटपाटनगर वसलेल होतं. कड्याकपार्यांना लगडलेल्या रंगीत टुमदार घरांचं..मनमिळावू हसमुख, देखण्या गोऱ्यापानलोकांचं. रामप्रहरी धुक्याच्या शाळेत आणि ढगांच्या कापसात साखरसुख घेत लोळणारं. अन मावळतीचा सूर्य मदिरेच्या प्याल्यात बुडवून श्रमपरिहाराच्या आनंदात बेधुंद होणारं..एकदा एक लाल वावटळ आली. नगरावर घोंगावून गेली..हैदोस झाला..कल्लोळ झाला. पण रक्तरंजित इतिहासाचे डाग मागे ठेऊन धुराळा खाली बसला.आटपाटनगरी पुन्हा सजली..चंग बांधून कामाला लागली. सुहास्यवदने पुन्हा फुलली. गावगल्ली-हर हमरस्ते पुनःश्च एकदा खळाळून गेली..त्याच शालींत..त्याच प्याल्यात. सुखांत..निवांत!
परिकथेतील गाव वाटतंय ना. पण खरंच असं कुठे असेल तर..अशी जागा गवसली तर!? या..तवांग तुमची वाट पाहतंय..भारताच्या अतिपूर्वेला अरुणाचल प्रदेशाच्या अंतरंगात ते दडलंय.फक्त वाट वाकडी करायची तयारी हवी.नावीन्य टिपायची कला आणि युद्धभूमी जाणून घेण्याविषयी गोडी हवी. पुढच्या काही पानांत ह्याच आटपाटनगरीच्या सहलीचं वृत्त.

मुंबईतली धावपळ आणि गुवाहाटीतला कल्ला ! 
अरुणाचल प्रदेश! नाव जितकं लांबलचक. भारदस्त. तितकाच हा हिमालयीन पर्वतरांगांच्या सौंदर्याने नटलेला, उगवतीचं सूर्याच्या सोन्यात सर्वप्रथम झळाळून उठणारा प्रदेश. विशिष्ट अशा भौगोलिक परिस्थितीत तिबेटियन संस्कृतीचं वाण जपणारी बुद्धभूमी. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं धावत दर्शन घडवणारं तवांग शहर व युद्धक्षेत्र आणि सेला व बूम ला हे अतिउंचावरील पास (हिमालयीन खिंडी) येथे यंदाच्या ‘एक दिवाळी सैनिकांसोबत’ ह्या उपक्रमाचा अंक निश्चित झालेला. तीनेक महिने आधीपासून सुरु असलेलं काटेकोर नियोजन, शिगेला पोहोचलेला उत्साह आणि टिपेला पोहोचलेली उत्कंठा ह्या सगळ्यात लक्ष्मीपूजनाची संध्याकाळ कशी निघून गेली कळलंच नाही. जवळपास मध्यरात्रीच्या सुमारास अमावास्येच्या बुडुक्क अंधारात कामथडी सोडली.दिवाळी साजरी करून आणि घरच्यांच्या मनोमन शिव्या खाऊन निघालेली भोर पासूनची मंडळी अजिंक्य शेठ ने दिलेले अवीट गोडीचे केसरी पेढे खाऊन गोट्याच्या पोराचा पापा घेऊन प्रवासाला सुरुवात केली. वाटेत मातृभूमी दर्शन टूर्सच्या वतीने वारजे येथे आईस्क्रीमचा भंडारा होता. त्याचा आणि संदीप गुरुजींच्या दर्शनाचा लाभ घेऊन चमू एक्सप्रेस वे वरून मुंबईकडे मार्गस्थ झाला. गप्पांची गाडी पण सुसाट सुटली होती. दोनतीन वाजता अल्टिमेट हायकर्स च्या बॅचलर पॉड वर आम्ही उतरलो. बाहेरच्या हॉल मध्ये चाललेला सगळा गोंगाट कानामागे टाकून किचनचा कोपरा पकडून झोप काढली. सात वाजता उठलो. योगेशच्या नवीन ऑफिसचं उदघाटन सर्वांहस्ते केलं. सगळ्या पोरांनी जल्लोष केला. नोकरी नावाचं दुष्टचक्र भेदून आणखी एक मित्र लायनीला लागला.अभिमान वाटला.त्याला शुभेच्छा देऊन,कौतुक वगैरे सोहळा आटोपशीरपने आवरून मुंबईच्या लाईफलाईनने मेट्रो स्टेशन गाठलं. इथे पोहोचलो तेव्हा जाऊन सर्व टीमचं एकत्रीकरण झालं. तडक एअरपोर्टला गेलो. मधल्या रिक्षाच्या टप्प्यात मुंबईने आपला खरा रंग दाखवला.आमच्या पैकी कुठल्यातरी एका पुणेकर तिकडीला रिक्षावाल्यानी ठगलं. कळल्यावर जरा तिळपापड झाला. अण्णाभाऊ साठेंच्या मुंबईच्या पोवाड्यातलं एक कवण आठवलं. पण जाऊद्या. तर विमानतळ दाखल झालो. छत्रपती महाराज शिवाजी आंतराष्ट्रीय विमानतळ.अलीकडच्या काळात बनलेली आणि देशाच्या आर्थिक राजधानीला शोभणारी एक अतिशय देखणी इमारत. चेक इन करून आत भव्यता निरखत इंजिनीरिंगविषयी डोकं लावत आम्ही गोल करून खालीच बसलो होतो. सगळ्यांनी एकसारख्या जर्सी चढवलेल्या आणि अंघोळ न केल्यासारखे मुंबईच्या हवेने पारोसलेले. त्यामुळे येणारे जाणारे आम्हाला दुबईला चाललेल्या मजूर टोळीसारखे बघत होते. त्यांचीही गम्मत पहिली. आणि कुणीतरी उठवायला आलं तेव्हा बोर्डिंग पास घेऊन आत गेलो.. आराम करायला हाताशी बराच वेळ होता. त्याचा फोटोबाजी करायला उपयोग केला गेला..वैकुंठयानात बसलो आणि निघालो आणखी एका दिशेच्या शोधार्थ पुर्वांचलात.

सव्वातीन तासांच्या लांबलचक फ्लाईटनंतर गुवाहाटीत दाखल झालो.. सिटीबस पकडून तडक हॉटेल गाठलं.( इथल्या सिटीबस म्हणजे खाजगी बसेस बरं  का.. पीएमटी, बेस्ट सारख्या भानगडी इथली मनपा करत बसत नाही..)नुकताच महाराष्ट्रातल्या निवडणुकीचे निकाल लागलेले. त्या पार्श्वभूमीवर वाटेत चक्क फडणवीस साहेबांच्या विजयाच्या शुभेच्छा देणारे बॅनर दिसले.. तेही अगदी एअरपोर्ट पासून गावापर्यंत. हॉटेल हे पलटन बाजार ह्या शहराच्या अगदी मध्यवर्ती भागातलं निवडलं  होतं. जिथून बस रेल्वे स्थानकं व इतर सर्व सुविधा जवळ होत्या.. दिवसभराचा शिणवटा गेल्या बरोब्बर अंघोळीला जाऊन धुवून काढला.. त्यानंतर शिकारीच्या शोधार्थ टोळ्यांची विभागणी दोन गटांत झाली..हा पलटनबाजार म्हणजे आवश्यक सर्व वस्तूंची रेलचेल असलेला भाग आहे.. चालत चालत हॉटेल शोधत फिरत असताना एका ठिकाणी स्थानिक दुर्गामातेच्या पंडाल समोर भूपेन हजारीकांची गाणी लावून केविलवाणी ताल धरायचा ‘व्यर्थ’ प्रयत्न करत होते. त्यांचं ते दुःख पाहवल नाही. म्हणून मग आमचं टोळकं क्रमांक २ त्याचं सांत्वन करायला सरसावलं..असमिया भूमीत ‘झिंगाट, एकुलता एक पाटलाचा लेक’ चा धुराळा उडाला. त्यात पाहुण्यांसोबत भूमिपुत्र दंगून गेले.. धुंदीत तर्र असलेल्या त्यांच्यासोबत राहुल आणि माउलीने जी काही जुगलबंदी रंगवली त्याला तोड न्हाई.. नागीण गणपती डान्स आदी आपल्याकडल्या शारीरिक हालचालींची/स्टेप्सची देवाणघेवाण झाली. अन असा हा नॅशनल इंटिग्रिटीचा उत्स्फूर्त सोहळा जय महाराष्ट्र घालून आवरता घेत एका पंजाबी खानावळीत हजेरी लावली.. मालक पाजी आणि आचारी स्थानीक पोरं पोरी.. असं ते अचाट बिझनेस मॉडेल. च्यायला आपल्या मराठी माणसाला कुठे अडत हे असलं धाडस करायला तेच काळत नाही धंद्यांबाबत.पण असो. जेवलो.जवळच असलेल्या रोषणाई ने नटलेल्या नेपाळी मंदिराला भेट देऊन आलो आणि झोपलो.

कमरतोड सुमो-प्रवास आणि सुखावणारं बोडोलॅण्ड

सकाळी सात वाजता निघायचं ठरलेलं.. त्यामुळे उत्साही जमाव सातच्या आतच खाली आला.. तर गाड्यांचा पत्ता नव्हता.. म्हणून मग गडी नाश्तापाण्याला बाहेर पडले.. आणि उत्साहाच्या भरात तिकडे पराठा..तोही.. मैद्याचा..तोही आसामी पद्धतीचा..वरून बार्गेनिंग करून ऑर्डर केलेला.. असलं काहीतरी अचाट साहस गड्यांनी रामप्रहरी अंगावर घेतलं..झालं.. तो कसलासा पराठा समोर आला. त्याच आणि समोर वैभवने त्याच्याकडे पाहून बनवलेलं तोंड पाहवेना.. मग काय पहिलाच घास तोंडात ढकलल्या बरोब्बर पंचेंद्रियांनी कौल दिला- मालिक..हमसे ना हो पायेगा.._/\_ म्हणून मी रणांगणातून काढता पाय घेतला.. बाहेर जाऊन एक केळंवाला पकडला..जोडीला आणखी एक रणछोडदास भेटला तो होता मंडळाचा खजिनदार तुषार दुधाने.. त्याच्या सोबत दोन डझन केळी बसवली.. मागोमाग योगेश, संतूआण्णा अन माउली अशी आणखी काही मंडळी तलवारी म्यान करून हजर झाली.. त्याबद्दल त्यांनाही केळ्यांचा लाभ झाला.. तिथे उभं होतो तर पलीकडे सेनेचा म्होरक्या गोट्याभौ वाटमारी करत हिंडत होता. त्याला धरून अर्धवट सोडलेल्या पराठा मोर्च्यावर नेऊन सोडला.. बिचाऱ्याने नेटाने कामगिरी फत्ते केली..असा मैतर सर्वांना मिळो!दोन तास गाडीची वाट पाहून चेहरे आंबट झालेले. हॉटेलात रिसेप्शन मध्ये बसवेना. अन दुसरी गाडी मागवन परवडणारं नव्हतं. अरुणाचलला गुवाहाटीतून जायचं असेल तर वरून म्हणजे थेट तवांगवरून गाडी बोलवावी लागते. वेळ लागतो तब्बल पंधरा तासांचा! दहा वाजता पंक्चर काढून मारियो ब्रोज डेरेदाखल झाले. हे आमचे अतरंगी सारथी. मोठाले नऊ जण एका बाजूला आले व आटोपशीर दहा जण एका बाजूला अशी वर्गवारी करून त्यांनी आम्हाला अक्षरशः गाड्यांमध्ये कोंबलं. आणि ब्रम्हपुत्रेच्या महाकाय पात्र ओलांडून आम्ही बोडोलँड मध्ये प्रवेश करते झालो.अर्ध्या तासात भोवतालचं चित्र पूर्णपणे पालटून गेलं. पूर्वांचलाची हीच खासियत आहे. क्षणाक्षणाला बदलणारे लॅण्डस्केप्स आणि इतकं वैविध्य कि दमछाक व्हावी. तर हा बोडोलँड म्हणजे ‘बोरो’ ह्या प्राचीन सभ्यतेचं आगर. चीनच्या उत्तरप्रांतातून आलेली हे लोक  तिबेटमध्ये जाऊन राहिले. पण नद्यांना आलेल्या पुरामुळे काहींचं विस्थापन होऊन ती खाली ह्या परिसरात येऊन स्थिरावले..(संदर्भ: इंटरनेट) ब्रम्हपुत्रेच्या उत्तरेला आणि भूतान अरुणाचलातल्या हिमालयीन रांगांच्या पायथ्याला असलेल्या नितांत सुंदर,सपाट,सुपीक प्रदेशातलेच होऊन गेली. प्रत्येक शेणमातीने सारवलेल्या घरांसमोर माश्यांनी व कमळांनी भरलेला हौद.. मागच्या-पुढच्या अंगणात कमालीची स्वच्छता आणि फुलझाडांची, पालेभाज्यांची शोभा.. अश्या शिस्तबद्ध घरा-वाड्यांनी प्रत्येक गाव बहरलेला..सुपारी पोफळीच्या माडांनी वेढलेला. सकाळी उठावं, समोरच्या तळ्यातला एखादा मासा मारावा, परसातली ताजी भाजी आणावी, भातासोबत त्याच लगीन लावून जेवण अन दिवसभर काई आपलं रानावनातली कामे बघत चौक-पारांवर चकाट्या पिटत हिंडावं. असा सुखांत निवांत कार्यक्रम.. आपल्या परंपरांच्या जपणुकीसाठी व स्वायत्त राहणीमानासाठी कमालीचा आक्रमक असलेला हा संवेदनशील लोकमनाचा प्रदेश.. हे मला झालेलं बोडोलँड च प्रथम दर्शन.

तवांगला जाण्यासाठी तसे दोन रस्ते आहेत. एक झिपसार-मंगलदोई-रोवता-कलकटांग-रूपा-बोमडिला-दिराँग हुन जातो तर दुसरा तेजपूर व्हाया रूपा येथून पुढे तवांग ला जाणाऱ्या एकमेव मार्गाला जाऊन मिळतो. आम्हाला भैरवकुंड ह्या ठिकाणाहून जाताना भुतानच्या सीमेला चाटून जाणारा महामार्ग व धनसिरी नदी पाहायची होती. म्हणून आम्ही पहिला मार्ग निवडला. आणि हा सगळा  द्राविडी प्राणायाम कुणाला टाळायचा असल्यास प्रतिमानशी तीनेक हजारात हेलिकॉप्टर ची सुविधादेखील उपलब्ध आहे. ती साहजिकच आम्ही घेण्याचा काहीही संबंधच नव्हता.हे वेगळं काय सांगायचं.

धनसिरी नदी पार करायला बांधलेला एक पूल पार केला कि आपण अरुणाचल प्रदेशात दाखल होतो. पहिल्या दोन मैलातच पायाखालच्या जमिनीचा कोण शून्यावरून तिशीकडे चढायला लागतो. सपाटीवरून निवांत चालणाऱ्या गाड्यांच्या चाकांना अनंत नागमोडी वळणांच्या शृंखलेशी टकराव होतो. चढत्या घाटागणिक ऑक्सिजनची मात्रा कमी होत जाते त्यामुळे इंजिनाची दमछाक जाणवते. मग लुकलुकत्या डोळ्यांनी गाडीच्या काचांमधून खाली डोकावताना खोलीचा अंदाज लावण्याचा व त्या सराईत ड्रायव्हर्सना हळू घे. सावकाश घे वगैरे म्हणण्याचा शहाणपणा आपण करू नये. अगदी बिनधास्त होऊन त्या सारथ्यांच्या आणि नशिबाच्या हवाली सारं काही सोपवून भोवतालचं देखणेपण टिपत राहायचं. पीजेज करायचे. आजूबाजूच्यांच्या बुडाला धक्काबुक्की करत तोल सावरत क्षणिक आराम मिळवत पडून राहणे. एवढचं आपल्या हातात असतं. आम्हीही हेच करत होतो. सुनीलवर सदर परिसरात नरभक्षक जमातींचा वावर आहे असं पिल्लू सोडून दिलेलं. तो त्याच चिंतेत होता. योगेशभाऊने(दस्तुरखुद्द) उलट्या केल्या होत्या.. त्यामुळे आपल्याला गाडी लागली तर लोक काय म्हणतील ह्या विचारातून आमची सुटका झाली.. दत्ताभाऊ ला एक हजार प्रश्न पडले होते.. पाटील आपले त्यावर डोकं लावत बसलेले..असा प्रवास सुरु असताना गाड्या आपल्या एका खाणावळीसमोर थांबल्या. अपेक्षेप्रमाणे गोर्यापान पोरींनी डाळभात वरणाचा थाळा समोर आणून मांडला. त्यावर भल्यामोठ्या ईडलिंबूची फोड अतिशय कष्टाने पिळून ताव दिला.. काहींना हाताने लिंबू पिळण्यात अपयश आले म्हणून मग त्यांनी बाहेर रस्त्यावर गाडीखाली लिंबं घालून आणली.. गाडीच्या चाकाखाली मंगलप्रसंगी प्रवासाला सुरुवात करताना लिंब ठेवतात तो रिवाज बहुदा इकडूनच आला असावा.. गाड्यांमध्ये माणसांची कोंबाकोंबी करून मारियो ब्रोज निघाले. साधारणपणे साडेतीन चार च्या सुमारास घाटावर मावळतीचा तांबडा रंग पसरला.सर्वत्र कोण देखणेपणा! गगनचुंबी हिमशिखरे देवदारांच्या हिरवाईत गायब झालेली, नितळ पाण्याचे खोऱ्यातून वाहत जाणारे तीव्र प्रवाह.. त्यांचा कानी पडणारा खळखळाट. घरट्यांकडे परतणारे पक्ष्यांचे थवे. अपूर्व देखावे..अन तितकेच देखणे स्थानिकांचे चेहरे. सर्वदूर पसरलेलं नितळ सौंदर्य फक्त.. कृत्रिमपणाचा लवलेशही नसलेलं.. दैनंदिन चिंता, दगदग आदी बाजूला करून तुमच्या चेहऱ्यावर समाधान फुलवणारं. तुमच्यातल्या जिज्ञासू लहान मुलाला चुचकारणारं.त्यामुळे त्यात बुडावं, पूर्ण हरवून जावं अगदी..

चार-साडेचार ला साधारणपणे सूर्यास्त झाला व हवेतला गारवा जसजस वर जाऊ तसा शून्य अंशाकडे सरकू लागला.. एव्हाना गप्पांचा स्टॊकही थोडा हलका झालेला म्हणून मग मोर्चा ड्रायव्हरकडे वळवला.. ह्याच नाव ‘ताशी’. पुलंच्या भाषेत वल्ली शोभावा. रस्त्याने जाणाऱ्या हरएक पोरीबाळींची छेड काढत निघालेला हा भिडू म्हंणजे श्रीकृष्णाच्या गोकुळातला, वा रजनीकांतच्या नात्यातला नगिनाच.. आत्मविश्वासाचा ज्वालामुखीचा जणू.. अमुक एक गोष्ट आपल्याला येत/माहित/जमत नाही असल्या शब्दांना सदर इसमाच्या शब्दकोशात जागाच नसावी.. त्यामुळे त्याने गाडीतल्या सर्वांची विकेट घेतलेली असूनसुद्धा त्याच्या हाती असलेल्या स्टिअरिंग व्हील कडे पाहून आम्ही शरणागती पत्करली. आणि अनेक गावातल्या अनेक मुलींमध्ये असलेला त्याचा मुक्तसंचार यावरील त्याच रसरशीत वर्णनं चवीने ऐकून घेतलं. आठ वाजता गाडी डिनरला थांबल्यावरच अनिच्छेने त्यातून सुटका झाली..दुसऱ्या गाडीतल्या सोबत्यांशी ह्या थांब्यांमुळे एकत्रीकरण व्हायचं आणि मजेत आणखी भर पडायची.. अपेक्षित मेन्यू डाळभात यायला वेळ होता. त्यामुळे शाहीर संतोष जुगदर यांच्या कवनाने समूह गायनाची मैफल सुरु झाली.. बहारदार लोकगीते, चित्रसंगीत यामध्ये सर्व गड्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.. केवड्याच्या बनातल्या नागिणीपासून सुरु होऊन ते देशभक्तीपर गीतांच्या मालिकेची चहापान अन डाळभाताने सांगता झाली. मारियोज ने माणसं परत गाडीत कोंबली अन गाडी पुन्हा एकदा चढणीला लागली.अकरा तासांचा प्रवास ऑलरेडी पूर्ण झालेला.. पहिल्याच दिवशी अपेक्षेप्रमाणे काहींची आबाळ झाली म्हणा पण त्यातही आनंद शोधत अजून पाच तास काढायचे होते. म्हणून अंधार, निर्जन घाटरस्ता, थंडिगारठा आणि वातावरणातला तंगपणा म्हणून भुताटकीच्या विषयाला हात घातला. त्यात पोरं बुडालेली असतानाच गाडी वरवर हिमाच्छादित पहाडांवर पोहोचली.. रात्रीचे अकरा वाजले होते..थंडगार वारे वाहत असावेत पण त्याचा चटका आत दाटीवाटीने बसल्यामुळे जाणवत नव्हता. एक भला मोठ्ठा झोला मारून गाडी एका चढवरील वळसा पास करून पुढे आली.. क्षणभरासाठी धुक्याची चादर सर्र्कन बाजूला गेली तेव्हा तिबेटियन बांधकाम शैलीत बनलेल्या कमानीवर ‘WELCOME TO TAWANG’ ही अक्षरे दिसली.अन पुन्हा ती धुक्याच्या आड गायब झाली..येस.. आम्ही सेला पास वर होतो.. समुद्रसपाटीपासून १३,७०० फूट उंचावर.. घरापासून खूप खूप दूर.. इथे येऊन उभं राहण्यात एक वेगळंच समाधान होतं.. नियमित दिनचर्येपेक्षा जेव्हा आपण अशी एखादी वेगळी गोष्ट करतो.. तेव्हा जगायला नवी ऊर्जा मिळते. मन अधिक तरुण होते.. त्यासाठी म्हणून हा प्रवास.. मग तो असा तवांगवारी सारखा कष्टप्रद असला तरी चालेल. कुरकुर न करता तो करावाच. तर अश्याप्रकारे माझ्यात ऊर्जेचा ओव्हरडोस झाल्याने जरा हलकं होण्याची गरज होती..कोणीतरी उलट्या करायला थांबला. संधी साधावी म्हणून मोजून एक मिनिटासाठी खाली उतरून धार धरली. अन वाऱ्याची एक अतिशीत झुळूक आली. तो बर्फाळ अनुभव अविस्मरणीय कोटीचा..त्यापुढे आता  निशब्द मी! झालेली अवस्था समजण्यासाठी वाचक सुज्ञ आहेतच.. त्यानंतर पुढे सेला पास उतरून रात्री दीड-दोनला तवांग येईपर्यंत कुडकुडलो.हॉटेलमध्ये गेलो तेव्हा हिटर लावून अंग सैल सोडून दिले. अक्खे पंधरा तास आखडलो होतो.

तवांग मॉनेस्ट्री आणि स्थलदर्शन
भल्या पहाटे उठून तडक बुमला ला जायचं ठरलेलं. पण सकाळी थेट सात पर्यंत मंडळी वर करून पडलेली. त्यामुळे तो प्रश्न बिनचर्चेचाच निकालात निघालेला. हुडहुडी भरवणारी प्रचंड थंडी, बर्फाळ पाणी, त्यामुळे अंघोळीचा प्रश्न मी माझ्यापुरता निकालात काढलाच होता त्याला सार्थ ठरवन्यासाठी गिझरच्या बिघाडाचं निमित्त पुरेस होतं. तक्रार करायचा प्रश्नच नव्हता कारण ट्रिपचं  बजेटच सुपर इकॉनॉमी क्लास दर्जाचं होतं .पण अश्या त्या विपरीत परिस्थितीवर मात करण्याचा अमोल दादांनी चंग बांधला. सपाट्या जोरांचा सपाटा लावून पठ्या तापत्या अंगाचा शॉवर खाली जाऊन उभा राहिला. चेतन बांदलांनीही त्यांचा कित्ता तसाच गिरवला. दोघांच्या धैर्याला अनेक सलाम (हे किती कठीण काम होत त्याचा अंदाज महाराष्ट्रात बसून लावता येणं केवळ अशक्य) हि शौर्यगाथा याची देही याची डोळा अनुभवून. आम्ही रूमचा दरवाजा लॉबीतून दिसणाऱ्या समोरच्या अप्रतिम देखाव्यासमोर काही क्षण स्तब्ध झालो.. समोर चौफेर पसरलेल्या तवांग शहराचा अप्रतिम नजारा होता.  येताना रात्रीच्या अंधारात त्याची जाणीव झाली नव्हती.. पहाटेच्या कोवळ्या उन्हात ते आटपाटनगर साखरझोपेतून उठत होते. रंगबेरंगी टुमदार घरांची दूरवर पसरलेली लोकवस्ती. एका टेकडीच्या टोकावर वसलेली मॉनेस्ट्री आणि तिच्या सरळ रेषेत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी टेकडीवर बसवलेली एक भव्य बुद्धमूर्ती. मध्यवर्ती बाजारपेठेचा सर्व रस्ता प्रार्थनेच्या पताकांनी आच्छादलेला. अन आवराआवरीत गुंतलेली, तोंडाला मफलर बांधून बाहेर पडलेली माणसे.. वेळ न दवडता मग आम्ही तडक खाली धावलो. गाड्याघोड्या यायला काही आणखी वेळ हाताशी होता.. त्यामुळे चहासोबत लाडाची मॅग्गी, अंडी वगैरे झाली. त्यानंतर मंडळी परेड ग्राउंड वर जमा झाली. निरभ्र आकाशाखाली एक भला थोरला हॉट अयर बलून बांधून ठेवलेला. निळ्याभोर आकाशाखाली त्याचे चटक रंग आणखी खुलून दिसत होते. काही फौजी दिसले. म्हणून एक दिवाळी सैनिकांसोबत उपक्रमाचा भाग असलेला शुभेच्छापत्र वितरणाचा शुभारंभ केला.. सैनिकांच्या चेहऱ्यावर एखाददुसरी हास्याची लकेर फुलवणं आणि अगदी उत्स्फूर्तपणे ती स्वहस्ते तयार करणाऱ्या आपल्या शाळकरी मुलं, परिचित-अपरिचित नागरिक यांच्यातला दुवा बनण्याचं भाग्य वाट्याला आलं त्याच फार समाधान वाटतं.

गाड्याघोड्या आल्यावर मोर्चा मध्यवर्ती बाजारपेठेतून तडक तवांग मॉनेस्ट्रीकडे वळवला. वाऱ्यावर डुलणाऱ्या रंगीत पताकांखालून जाताना  त्यांच्या गालावर पडणाऱ्या सावलीचा व कोवळ्या सूर्यकिरणांचा खेळ बरा वाटत होता. हलकं फील होत होतं.फोन फ्लाईट मोडला ढकलून दिला आणि मॉनेस्ट्रीत दाखल झालो. पोटला पॅलेस ल्हासानंतर हा जगातला दुसऱ्या क्रमांकाची मॉनेस्ट्री..तवांग नदीच्या काठावर पाचव्या दलाई लामांच्या आदेशानुसार बनवलेली महत्वपूर्ण संस्था.कमानीतून आत गेल्यावर उजव्या हाताला प्राचीन पुस्तकांनी भरलेली लायब्ररी ठेऊन हिमालयीन मखमलीचे फुलांवर हात फिरवत मुख्य आवारात शिरलो. हलकासा उन्हाचा चटका बसत होता पण त्याची झळ कमी करायला देवदारच्या सावल्यांचा थंडगार स्पर्शही सोबत होता. स्वच्छ हवामान आणि सकारात्मक ऊर्जेने ओतप्रोत भरलेलं वातावरण. पटांगणाच्या एका हाताला सर्व लामांची निवासी व्यवस्था आहे आणि ह्यात साधारणपणे चार पाचशे विद्यार्थ्यांची व्यवस्था आहे. सोबतच प्राचीन तिबेटियन लोकजीवनाचे प्रदर्शन मांडलेलं एक छोटेखानी वस्तुसंग्रहालय देखील पाहण्यालायक आहे. ते पाहून घेतलं व मुख्य प्रार्थनागृहात शिरलो. मधोमध एक शांत, संयत, करूणादायी भावमुद्रांनी सजलेली तथागत बुद्धांची भव्य पितळी मूर्ती. लाकडी भुईवर लाल आवरण घातलेल्या बिछायती व बाहेरील तापमानापेक्षा आत जाणवणारा उबदारपणा, रंगीबेरंगी रेशमी वस्त्रांनी सजावट केलेले अंतरंग. तिबेटीयन वास्तुकलेतल्या बारकाव्यांपुढे, सांस्कृतिक, अध्यात्मिक प्रगतीपुढे, शिष्टाचारांतल्या प्रगल्भतेपुढे नतमस्तक व्हायला होतं. अन अश्या जागा ह्या सर्वांचं अगदी जिवंत दर्शन घडवतात.. इथे थोडावेळ ध्यानधारणेचा आनंद लुटून ते लाजवाब ठिकाण सोडलं. पण तिथे अनुभवलेले क्षण आजही ताजे वाटतात..आणि कायमच वाटतील..नुकत्याच उमललेल्या ब्रम्हकमळासारखे! आणि ह्या सर्व क्षणांची अनुभूती घ्यायची असेल तर प्रवासायन करायलाच हवे!

तर अश्याप्रकारे वेदपाठशाळेतल्या अध्यात्मिक वातावरणात भिजून मग आम्ही खुल्या आकाशाखाली मांडलेली शहराच्या सौंदर्यात भर घालणारी विशाल बुद्धमूर्ती पाहायला गेलो. तिचा परीघ सगळा प्रार्थनाध्वजांनी मढवलेला. खाली शहराचा चौफेर नजर. जणू भगवान बुद्ध स्वतःच उंचावर बसून आशीर्वचने त्यांवर ढाळताहेत. वाऱ्यावर फडफडणाऱ्या पताका आपल्या रंगांची आणि ओम मणी पद्मे हुन ची मंत्रपुष्पांजली साऱ्या गावावर उधळताहेत. सुनीलने इथून आपल्या सत्तर हजारी फोन मधून अनेक देखणे शॉट्स  टिपले. अमोल दादांनीही अनेक गवळणींना सेल्फीमध्ये चीज करायला लावून नॅशनल इंटिग्रिटीला हातभार लावला. दादा म्हणजे शिंग मोडून वासरात घुसणारं  व्यक्तिमत्व आहे ह्याच प्रात्यक्षिकच सादर केलं जणू. त्याला ग्रुपमधल्या सर्व लग्नाळुंनी, सिंगाल्यांनी तोंडाचा आ वासून, तर कुणी तोंडात बोट घालून दाद दिली. गोट्याभौने मला थोडं डीएसएलआर ट्रेनिंग पण दिलं  इथं त्याबद्दल त्यांचे वीसेक हजार फोटोज ब्लर करून आभार..

तवांग युद्ध स्मारक आणि ६२च्या युद्धाचा अप्रतिम लाईट अँड साऊंड शो
त्यानंतर आम्ही तवांग वॉर मेमोरियलला गेलो. तिथल्या हिरवळीवर बसून दोनदोन सॅन्डविच रिचवले. पण भूक काही शमली नाही. म्हणून हॉटेल शोधू लागलो. एका छकुलीच्या  हॉटेलमध्ये दालमखानी व भात मागवला त्यावर कडक ताव दिला. काही जणांनी मागवलेले चायनीज पदार्थ किचनमधून आले तशे मोरीत गेले. आमचा मात्र पहिला लंच सुखनेव पार पडल्यामुळे रूमवर जाऊन निवांत दोन तास पडी टाकली. पाच वाजता सुरु होणाऱ्या लाईट अँड साउंड शो च्या निमित्ताने मंडळी लगबगीने झाली. एक गाडी आली. भाग्यवंतांनीं जागा पटकावली. उरलेल्या गटाने एकमताने  धावत जाऊन  ठिकाण गाठण्याचा  केला. अन त्याप्रमाणे गारठ्यात अंधारात पाऊल वाटा चाचपडत आम्ही पोहोचलो. पण त्यात त्यात पाचेक मिनिटं उशीरच झाला. मिलिटरीच्या सुभेदारी शिस्तीमुळे  मग आम्हाला सहाच्या बॅच साठी थांबावं लागलं. मधल्या वेळात कार्यकर्त्यांनी जवानांना शुभेच्छापत्रांचं वाटप करून आपलंसं  करून घेतलं. थिएटरमध्ये सहाच्या ठोक्यालाच घुसून  ओळीने बसलो व एक अतिशय चित्तथरारक युद्धपट आमच्यासमोर दृकश्राव्य  पद्धतीने मांडला  जाऊ लागला.


रायफलमॅन जसवंत सिंह बाबाचीं सेला  व तिच्या बहिणीच्या मदतीने ३०० चिनी सैनिकांना  यमसदनी धाडल्याची  शौर्यगाथा तिथे ज्याप्रकारे मांडली  जाते कि सर्वांग रोमांचित होतं . लेखनविस्तार टाळण्यासाठी येथे तपशील मांडत नाही.  पण साधारणपणे  चाळीस मिनिटांची  दिव्यतेजाची व सैन्याच्या अतुलित पराक्रमाची कहाणी आपल्यात वीरश्री अन देशप्रेमाची मशाल अधिक तीव्र  केल्यावाचून राहत नाही. कार्यक्रमाच्या समारोपाचं राष्ट्रगीत मग आपण अजूनच खड्या  आवाजात म्हणतो. त्यावर बांदलांसारखा एखादा राष्ट्रभक्त भारमातेचा बुलंद जयघोष करतो तेव्हा मंत्रमुग्ध झालेला प्रेक्षकवृंद त्याच वेळी १९६२ च्या युद्धाची भळभळती जखम  मनावर घेऊन बाहेर पडतो. ब्रिगेडियर दळवींनी केलेल्या सूचना, अपुरी युद्धसामुग्री, रसद पुरवठ्याचा अभाव, आदी अनेक प्रतिकूलता असताना खटक्याच्या बंदुका घेऊन लढलेल्या आपल्या सैन्याचं  किती कौतुक करावं. तवांगचा पाडाव, चिन्यांनी केलेला अनन्वित अत्याचार, व देशाची झालेली नाचक्की. ह्या गोष्टी डोळ्यात पाणी आणतात. पण त्याच वेळी सह्याद्रीपुत्र  यशवंतरावांनी त्यानंतर  केलेलं सैन्यच शाशस्त्रीकरण, व सध्याची शस्त्रसज्जता ह्याही तवांग बाबत सुखावणाऱ्या बाबी!
तवांग फेस्टिव्हल २०१९..सोहळा चैतन्याचा!

युद्धाच्या इतिहासाची पाने चाळल्यावर  जड  झालेलं डोकं शांत करणं गरजेचं होतं म्हणून तिथून वळलो ते थेट जत्रेच्या मैदानाकडे म्हणजेच तवांग  फेस्टिवल सोहळ्याकडे. शहर सगळं डोंगराच्या आश्रयाने वसलेलं. त्यामुळे नागमोडी रस्त्याच्या वळणांवरून खाली उतरताना एका उंचसखल ठिकाणी मैदानातून उठणारे प्रकारशझोत गावकर्यांप्रमाणे आम्हालाही खुणावत होते. त्यामुळे  रस्त्याने जाताना स्वेटरबंद पेहरावात मास्क लावून निघालेल्या पोरं-पोरींच्या जथ्यांना आम्ही लगबगीने तवंग फेस्टिव्हलच्या कमानीसमोर येऊन उभे राहिलो अन सगळ्यांच्या तोंडातून एकच सूर बाहेर पडला तो  म्हणजे एक भला मोठ्ठा WowSSS! कारण नियोजन अतिशय अनपेक्षित आणि कमालीचं भव्यदिव्य होतं. सप्तरंगी रोषणाईत न्हाऊन निघालेला रंगमंच, त्यासमोर तेवढ्याच उंचीचा व्यासपीठ व स्टेडियम..आणि पटांगणात मांडलेले भलेथोरले साउंड सिस्टिम्स व उत्साहाने ओतप्रोत भरलेला कमालीचा देखणा व शिस्तबद्ध क्राऊड.अगदी थेट सनबर्न फेस्टिव्हल्सच्या धर्तीवर केलेलं नियोजन. फरक फक्त इतकाच की आपल्याकडचा सनबर्न सर्वसामान्यांना न परवडणारा तर इथला सर्वसामावेशक सरकारी आशीर्वादानेच आयोजित केलेला.अरुणाचल पूर्वांचलातल्या राज्यांइतकाच समृद्ध आहे.. पण त्यातही तिबेटचं दक्षिण टोक असल्याने इथे अध्यात्मिक प्रगतीचीही जोड आहेच. विविध जमातींच्या परंपरांची  वेषभूषांची प्रदर्शन अगदी थोडक्यात संपूर्ण दर्शन होऊ शकेल अश्या पद्धतीची सादरीकरणं मुलंमुली रंगमंचावरून करत होती. त्याला अगदी उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसादही  मिळत होता. याकची शिंगं, वेगवेगळ्या प्राण्यांच्या कातड्या व शरीरांचे अवयव, झाडांच्या साली, लाकूडकाम व वनसंपदेतल्या अनेक प्रकारच्या गोष्टींपासून बनवलेले पेहराव व ते नेसण्याची कला हे सारं ह्या राज्याने अभिमानाने जपलंय.  आणि त्याच्या जोडीला लोकसंगीत, पारंपरिक नृत्याविष्कार व काळाच्या रेट्यात  मागे पडत चाललेली प्राचीन पारंपरिक वाद्ये सुद्धा. ह्या सगळ्या नवलाईची जपणूक करायला प्रचंड इच्छाशक्ती लागते. मेहनत लागते. अरुणाचलकडे ती पुरेपूर आहे.

आणखी एक गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे परंपरा व लोककला इथल्या जीवनाचा अविभाज्य घटक तशीच आणखी एक गोष्ट म्हणजे मदिरा. जिला वगळून इथल्या लोकजीवनाचा विचारच केला जाऊ शकत नाही. स्थानिक बाळं  दुधाचा घोट नंतर घेतात त्यापूर्वी त्याला वाईनचा डोस पाजतात.हि अतिशयोक्ती नाही वस्तुस्थिती आहे. घरोघरी वाईन बनवण्याची पद्धत आहे. इथल्या अतिशीत हवामानामुळे ती एक गरजदेखील आहे. आणि सेवनाचं नित्यनियमित प्रमाण राखल्याने ती इथे आरोग्यदायी सिद्ध होते. त्यामुळे त्या अतिप्रिय मदिरेच्या डोहात बुडालेला समारंभ अबालवृद्ध अगदी  एन्जॉय करत होते. गोलवेढ्यावर मांडलेल्या खाण्यापिण्याच्या शिथुलानमधून वाहणाऱ्या  नद्या’मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्यात’. मैदानातल्या गर्दीत आणि उत्साहाच्या भरात आमच्या गटात फूट पडली. मी आणि गोट्या मागे राहिलो. सगळ्यांना फोन करून काहीच ऐकू येईना. म्हणून मग आम्ही ठरवलं कि छोड यार मोमेन्ट पे काँसंट्रेट करते है। परंपरांचं सादरीकरण झाल्यावर डीजे नाईट होती.मेलोडियस गाणे सगळ्या गावासोबत एकसुरात गायलो. धाप लागेस्तोवर नाचलो अगदी शेवटचं गाणं वाजविस्तोवर.मध्यरात्रीच्या सुमारास गड चढून गेलो.आणि हॉटेलात जाऊन झोपलो.त्या चढणीदरम्यानचे प्रसंगही अतिशय सुंदर पण अगदीच  खाजगी आहेत त्यांचा लेखनविस्तार टाळतो. तर असा हा चैतन्याने भरलेला तवांग  फेस्टिव्हल आम्ही अक्षरशः बेधुंद होऊन जगलो. खूप मजा केली. तवांगच्या, मोनपांच्या प्रेमात पडलो.  ( सकाळच्या वेळात मुख्य बाजारात होणारे कार्यक्रम वगळता व समारोपाच्या दिवशी मुख्य अतिथी म्हणून आलेल्या कपिल शर्माचे व्हॉट्सअप छाप जोक वगळता)ह्या इतक्या शानदार व यशस्वी नियोजनासाठी मुख्यमंत्री पेमा खांडू आणि त्यांच्या टीमचं खूप खूप कौतुक व अभिनंदन.लोकमानाची नेतृत्वाला जेव्हा खरी जाण  असते तेव्हा जाऊन अश्या संकल्पना मूर्त रूपात येतात. शहरांची ओळख बनतात.

बूम ला पास ऍडव्हेंचर, सैनिकांच्या गाठीभेटी, श्यांगेत्सर सरोवर
तवांग मुक्कामाचा दुसरा दिवस भल्या सकाळी सुरु झाला कारण दिवसाचा कार्यक्रम भरगच्च होता. सकाळी शहराच्या मध्यभागातून मॅरेथॉन आयोजित होती पण तिला हॉटेलच्या गॅलरीमधूनच शुभेच्छा देऊन आम्ही खाली आलो. गाड्या आल्या त्यात आम्ही स्वतःला कोंबलं ते थेट बूम ला पास ला उतारण्यासाठीच. गावापासून फक्त चाळीस किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण. पण हा सोप्पा  पल्ला अजिबातच नाही. अजस्र् अश्या कड्या-कपाऱ्या, वर्षभर बर्फाखाली असल्यामुळे उघडेबोडके पडलेले हिमालयीन सुळके अन त्यांचा मर्मभेद  करत अंथरलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरून आम्ही धावत होतो. कॅप्टन  संभाजी पाटील यांच्या कल्पनेतून अन प्रयत्नातून  सदर  मार्गाचं अतिशय सार्थ नामकरण पाहिल्यावर मन  रोमांचित होऊन जातं. क्षणाक्षणाला रंग बदलणाऱ्या चंचल अबलेलाही लाजवेल इतक्या वेगाने जिथे हवामानाचे नूर बदलतो, निरभ्र अन लक्ख वाटणारा भवताल अचानक धुक्यात हरवून जाऊन दिसेनासं होतं. शून्याच्या खाली पारा  उणे पंचवीस तीस पर्यंत जातो. समुद्रसपाटीपासून पंधराएक हजार फूट उंची अन त्यामुळे हवेतला प्राणवायूचा तुटवडा त्यामुळे होऊ शकणारा अक्यूट माउंटन सिकनेस चा त्रास इतकी सारी विपरीत परिस्थिती. पण त्यावर मात करत दुर्दम्य इच्छाशक्ती व अपरिमित साहसने बीआरओने बांधलेला हा रस्ता  कापताना मनात सैन्य आणि बीआरओविषयी आदर व अभिमानाच्या भावना जागत राहतात. रस्ते  म्हणजे देशाच्या रक्तवाहिन्या. अन अश्या वाहिन्यांचं देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने व दुर्गम भागात राहणाऱ्या आपल्या देशबांधवांच्या लोकजीवनासाठी महत्वपूर्ण असं हिमालय- भर जाळं बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने भगीरथ प्रयत्नांनी विणून ठेवलंय.. विणत आहेत.अन त्यासाठी आपण आजन्म फक्त उपकृतच आहोत. त्यातून एकाही भारतीयाची उतराई होण्याची शक्यता नाही.

मनोमन चाललेला हा आदरभाव वाहण्याचा सोहळा सुरु असतानाच आजूबाजूचा अविस्मरणीय देखावाही आम्ही डोळ्यात साठवून घेत निघालेलो. मध्येच माईल स्टोनच्या जोडीला प्रेरणादायी वाक्ये लिहिलेले फलक. एका ठिकाणी दगडधोंडे रचून रंगवून एक डोंगरभर लिहिलेली ‘LIVE DANGEROUSLY’ ही अक्षरे उत्साह वाढवत होती. AMC मुळे  हलकं हलकं चढलेलं डोकं त्यावर उतारा म्हणून गाडीतली गरमागरम चर्चा चालू असतानाच आम्ही ‘Y-जंक्शन’ गाठलं.UTH ची एक टीम गेल्यावर्षी इथूनच खराब हवामानामुळे माघारी गेलेली. पण ह्यावेळी सुदैव आणि काही पुण्यवान मंडळी मोहिमेत असल्याने तेव्हाची अपूर्ण धाव पुरी करण्याची संधी जुळून आली. औपचारिक आठ किलोमीटरची दौड उत्कंठेच्या रेट्यात  पुरी केली. आणि बूमला पास वर सर्वांनी पाऊल ठेवलं. बास्स यासाठीच जणू केला हा सगळा अट्टाहास! देशाच्या एका सर्वोच्च टोकावर, अतिशीत व अतिसंवेदनशील पहाऱ्याजवळ आम्ही उभे होतो आणि डोळ्यासमोर  होती देशाच्या मस्तकावर इंग्रजांनी कायमस्वरूपी कोरलेली मॅकमोहन रेषा. १९६२ च्या युद्धातील भळभळती जखम. व पलीकडे चिनी ड्रॅगन च्या विळख्यात अडकलेला पवित्र भूप्रदेश. डोळ्यांसमोर युद्धाचं  भीषण चित्र उभं राहिलं. अंगावर दरारून काटा उभा राहिला. याच मार्गाने पिवळी माकडं भारतमातेचे लचके तोडायला  घुसली. इथेच आपल्या शूर सैनिकांनी निधड्या छातीने सर्वप्रथम ती वावटळ शून्य तयारीनिशी अंगावर घेतली.  अंगावर पुरेशे उबदार कपडे नाहीत, लढायला पुरेशी हत्यारे नाहीत,व रसद येण्याची व अधिकची कुमक येण्याची सुतराम शक्यता नसतानाही ; आपल्या सेनेच्या नव्यान्नव नरसिंहांनी हिंदी चिनी भाई भाई ह्या खुळचट कल्पनेपायी झालेल्या विश्वासघाताची किंमत म्हणून आपल्या प्राणांची आद्यसमिधा येथेच वाहिली. युद्धाचा यज्ञकुंड धडाडला. कहाणी सांगायला म्हणून एक जण जिवंत राहिला . ज्याने जाऊन हल्ल्याची बातमी बेसकॅम्पला पोहोचवली. बर्फाचे तट पेटून उठती। सदन शिवाचे कोसळतें।  ह्या अजरामर कवितेची ही  पार्श्ववभूमी जिवंत झाली. मातृभूमीच्या रक्षणासाठी  ज्यांनी रक्ताचं शिंपण घातलं त्या जवानांच्या  शौर्यकथा तिथल्या तुकडीतल्या एका सुभेदाराने उत्स्फूर्तपणे विशद केल्या. शेवटी त्याचं एक वाक्य होतं  कि ये १९६२ का भारत नही  है अब आयेंगे तो देख लेंगे! त्यावर अभिमानाने फुललेल्या मंडळाने भारतमातेच्या निनादात आसमंत निनादून सोडला. योगेशच्या हस्ते एक आमच्याकडचं सर्वोत्कृष्ट शुभेच्छापत्र दिल्यानंतर वैभवने एक दिवाळी सैनिकांसोबत हा उपक्रम विशद केला. इतर जवानांनाही  वाटप करून झालं.सैन्याच्या कृपेने चौदा हजार फुटांवर चहापाण्याची नाश्त्याची वगैरे सोया झाली अन त्यानंतर इंडो चायना फ्लॅगमीटिंगची जागा, युद्धस्मारक स्तंभ( दगडांची रास) पाहून आम्ही बूम ला चौकी सोडली ते उरात काहीतरी वेगळे क्षण अनुभवल्याचं समाधान घेऊन.

Y-जंक्शन ला आलो कि नाही ते मला नीटस आठवतं  नाही पण थोड्या वेळाने ड्रायव्हरने  गाडी एका खडकाळ रस्त्यावर घातली. बहुदा तो शॉर्टकट मार्ग असावा.. पण समोर ज्या ज्या वळणावर आम्हाला असं  वाटलं कि इथून पुढे रस्ताच  नाहीये त्या त्या प्रत्येक वळणावरून ह्याने गाडी घातली. कित्येकवेळा चारातला एक टायर  हवेत राहायचा असली रस्त्याची स्थिती पाहून तोंडाचा आ वासायचा. बारा एकच्या सुमारास ते पठार रस्त्यातून घुसलेले ओढे नाले पार करून आम्ही घाटमाथ्यावर आलो. बिडी बाबा नामक देवाचं म्हसोबाश्रेणीतलं मंदिर मागे टाकलं व नागमोडी वळणांचा रस्ता  उतरून आम्ही खाली गेलो.

 गाडीतून खाली उतरलो तेव्हा एक केवळ अपूर्व दृश्य नजरेसमोर होते. एखाद्या खोलगट बशीसारख्या भौगोलिक रचनेच्या तळाशी असलेल्या श्यांगेत्सर तळ्याच्या काठावर आम्ही उभे असतो. गोल वेढ्यावर कातळकड्यांचा वेढा, एका कोपऱ्यातून खोलवर हिमालयात घुसलेली वाहत आलेल्या एका पात्राची कड असा भूगोल. अन मागे कधीतरी ह्या पात्रात उभी असलेली पण भूकंपाच्या एका धक्यात  उन्मळून पडलेल्या वृक्षांची वठून  गेलेली काळीकुळकुळीत खोडके.. जी कि आज ह्या जागेचा यूएसपी आहेत. व त्या जोडीने डौलाने फडकणारा शानदार तिरंगा..अशी श्यांगेत्सर  च्या प्राकृतिक सौंदर्याची महती.

एवढा मोठ्ठा लँडस्केप, सूर्याच्या कोवळ्या किरणांनी नितळ पाण्यावर घातलेला सोनेरी साज व त्यातून वर उठलेली खोडं अन वाऱ्यावर उडणारे प्रार्थनाध्वज पाहिल्यावर आम्ही जरा रेंगाळलोच. आता थंडिगारठा  भरल्याने प्रचंड भूक लागलेली. इथेही सेनाच धावून आली, एरवी मी कधीही ज्याच्याकडे पाहिलं नसत पण अतिशय ऑथेंटिक चवीचे छोले भटुरे  त्यांनी इथे मेन्यू कार्डवर ठेवलेत. खाऊन झाल्यावर संतूआण्णा आणि मी काठावर येऊन चहाचा काप हातात धरून  समोरच्या नेत्रसुखद नजाऱ्यासमोर  उभारलो. महेश मींड ने पाटलांवर एकसारखा कॅमेरा धरलेला. इथे दिलेलं ९५१७ फोटोंचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्याची तारांबळ उडालेली. संदीपच्या फोटोंचं आव्हान सुनीलने लीलया पेललेलं. अशी आम्ही सर्वांन्नीच यथेच्छ मॉडेलिंग करून घेतली. कोयला ह्या लोकप्रिय सिनेमातलं  तनहाई  तनहाई  हे अतिशय गोड  गाणं इथे शूट झालंय. तेव्हापासून ह्या तळ्याला  माधुरी लेक सुद्धा म्हणतात. मुळातच देखणं लोकेशन त्यात माधुरीच नृत्य त्यामुळे तिथे च आर्मीच्या कॅन्टीन मध्ये स्क्रीनवर ते गाणं बघताना कोण मजा आली म्हणून सांगू! खरंतर ह्या जागेची तिथूनच पुढे प्रसिद्धी झाली. दिग्दर्शक राकेश रोशन ह्यांचं त्याबद्दल खूपखूप आभार व कौतुकसुद्धा. इतक्या दुर्गम भागात सर्व लावाजम्यानिशी जाऊन शूटिंग करणं  म्हणजे दिव्यच.. तृप्त मनाने माघारी फिरलो. आणि तळ्यावरून  घाटमाथ्यावर येईपर्यंत वातावरण  पूर्ण खराब झालं. इतकं कि समोरचा रस्ताही दिसेना. दोन्ही ठिकाणी आम्ही प्रचंड रेंगाळलो होतो. त्यामुळे तश्याही परिस्थितीत खोरपा ने गाडी अशी काही पिंगवली आणि दीडेक तासातच आम्हाला ९मराठा एलआय च्या मराठा ग्राउंड ह्या कवायती मैदानासमोर आणून उभं केलं. तिथल्या सुभेदाराला गाठून एक दिवाळी सैनिकांसोबत ही  संकल्पना सांगितली. नित्यनियमाप्रमाणे फौजी मैदानात परेड साठी जमा झालेले. त्यांच्याशी बोलायला एक प्रतिनिधी व त्याच्याच हस्ते काहींना वाटप अशी व्यवस्था केली. वैभव ती कामगिरी चोखपणे पार पाडत असतानाच दोन सैनिकांनी काळ्याजर्द चहाचे प्याले आमच्या हातात आणून ठेवले. कठीण प्रवासात अंग जरा आळसावलेलंच. त्यामुळे नकळतपणे प्याला हातात आल्याबरोब्बर चहाचा एक झुरका घप्पकन घेतला.. एक क्षण जरा स्तब्धतेत गेला. पण काळीमिरी, लवंग दालचिनी घातलेला तो चहा नावाचा तुफ्फान कडक काढा पोटात  गेल्याबरोब्बर सर्वांगभर उब निर्माण झाली. डोक्याची केस उभं राहिल्याने चार दोघांनी दोन चार घोटांतच ‘I  QUIT’ केलं. असं  हे जबरदस्त व्हिटॅमिन टी घेऊनच आपलं अजिंक्य सैन्यदल हिमालयाच्या उत्तुंग शिखरांवर पाय रोवून गस्त घालत उभे असतात. सुरुवातीला जड गेलं. शेवटी प्याल्याला तळ दाखवला. मेजरची रजा आणि परवानगी घेऊन वळणावर उभ्या शिवरायांच्या मूर्तीसमोर उभे राहिलो. मनात विलक्षण समाधान झरत होतं. समुद्रसपाटीपासून साडेतेरा हजार फूट उंची, मायबाप सह्याद्रीच्या कोणत्याही दगडधोंड्यापासून किमान तीन हजार अंतरावर आणि हाकेच्या अंतरावर असलेल्या शत्रूसीमेवरचं  ते स्मारक दीपोत्सवाच्या मंगलमय प्रकाशात उजळून टाकण्याचं, आपल्या राजाच्या प्रति कृतज्ञताभाव व्यक्त करण्याचं भाग्य आमच्या पदरात पडलेलं.

अजेय भारतीय सैन्यालाही ज्यांची प्रेरणास्थान म्हणून पूर्णाकृती मूर्ती उभारावीशी वाटली असा पराक्रमी वीर पुरुष म्हणजे छत्रपती शिवराय! त्यामुळे खरोखरच हे म्हणावं वाटत कि,  शिवराय असे आमचा शक्तीदाता!परकीय सत्तेच्या बहुशतकी दुष्टचक्राला भेदून, निद्रित समाजपुरुषाच्या मनात स्वातंत्र्य-क्रांती-राष्ट्रीयत्व यांची ज्वाला  चेतावणारा एकमेकाद्वितीय सेनानायक, द्रष्टा नेता म्हणजे शिवबा माझा! चौफेर वेढलेल्या शत्रूंच्या टाचेखाली रगडलेल्या , खचलेल्या रयतेचा आधारवड बनत, अठरापगड जातीजमातींना हाताशी धरत हिंदवी स्वराज्याची पताका आलम हिंदुस्थानी पातशह्यांच्या छाताडात रोवणारा तो राजा आमचा!सैनिकांहाती तळपत्या तलवारी देण्याआधी महाराष्ट्राच्या भूमीत सोन्याचा नांगर धरून राष्ट्रभक्ती-धर्माभिमानाची बीजे रोवणारा, ‘सर्वांस पोटांस लावणारा’ तोच ‘लाखांचा पोशिंदा’ माझा!उण्यापुऱ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात अविरत कष्टाने कर्तृत्वाचं सर्वोच्च  परिमाण आखून दिलेला आणि चंद्रसूर्य असेपर्यंत ज्याची कीर्ती राहणारच आहे तो अमुचा पुण्यवंत कीर्तिवंत जाणता  राजा!

चौथऱ्यावरच्या अश्वारूढ मूर्तीभोवती पेटणाऱ्या प्रत्येक पणतीसोबत अशी एकेक स्तुतीसुमने मंडळी राजांप्रती मनोमन वाहत होती. कृतकृत्य मनाने ‘तव तेजाचा अंश मला दे’ म्हणून शिवसुर्याला साकडं घालत होती. शेवटचा दिवा प्रज्वलित केला व जयजयकारात मराठा ग्राउंड चा निरोप घेतला. वेळेचं गणित पूर्णपणे बिघडलेलं त्यामुळे खोरपाच्या रथात जीव मुठीत धरून बसलो. अर्ध्या पाऊण तासात आम्ही शहरात पोहोचणं गरजेचं होत कारण उशीर झाल्यास त्याला मेकॅनिक मिळणार नव्हता. त्यामुळे त्याने गाडीचा अक्षरश:कान पिळून त्याने अर्ध्या तासात आम्हाला गाव दाखवला.

पण एवढा सगळं धुराळा करूनही शांत बसणार आमचा चमू नव्हताच. रूमवर पोहोचताच आवराआवर करून तडक सर्वजण तवंग फेस्टिव्हलसाठी तयार झाले. गावात एक बंगाली खानावळ आहे. नंतर कळलं कि तीही ऐकमेवच आहे. पण जेवायला गेलो तेव्हा अनेक विनवण्या करूनही तो आम्हाला जेवायला द्यायला काही तयार होईना. त्याने हाकललं तेव्हा जत्रेची वाट धरली तेव्हा तुफान गर्दी असताना धक्काबुक्की करत एका पाजीच्या ठेल्यावर कुलचा पराठा मिळवला. तेवढाच खाऊन,व नाचून गाऊनच  ह्याही दिवसाची सांगता केली.

गूढरम्य झेमिथान्ग खोऱ्यातली उनाड भटकंती

तवांग  मुक्कामाचा आज शेवटचा दिवस. सकाळी लवकर उठलो.. वातावरण ढगाळ होतं. त्यामुळे भल्या पहाटे उठून बुद्धमुर्तीजवळून दिसणारा सूर्योदयाचा नजर पाहायला गेलेल्या दत्ता आणि टीमचा भ्रमनिरास झालेला. असो. पण आज ठरल्या वेळेला आमच्या गाड्या डेरेदाखल झाल्या. झेमिथान्ग व्हॅली नावाच्या गूढ परिसरात आजच्या भटकंतीचं  नियोजन केलेलं. गूढ अश्यासाठी कारण काल रात्री परतल्यावर ड्रायव्हरकरवी ऐकलेली एक विलक्षण रोमांचक दंतकथा.एका स्थानिक जमातीच्या कुठल्यातरी एका  एका विलक्षण रूपवान स्त्रीसोबत लग्न केले. त्यांना अनेक अपत्ये झाली. पण त्यानंतर राजपरिवारातील एकेक करून सर्व सदस्य ऎनकेन कारणाने मरण पावले व शेवटी राजसुद्धा. मान्यता अशी कि ती स्त्री स्वतः एक चेटकीण होती व तिला झालेल्या अनेक अपत्यांपैकी अनेक मुली ह्याही चेटकीण बनल्या.व त्याच आता सादर परिसरातील लोकांमध्ये समरसून गेलेल्या आहेत. इथल्या सर्वच मुलं  मुली अतिशय सुंदर आहेत त्यामुळे त्यांच्यातून त्यांना ओळखणं शक्य नाही. त्यामुळे इथे गेल्यावर कोणाशीही बोलायचं नाही, अन पॅक्ड गोष्टी घेऊन खायच्या नाहीत व कोणाशीही डोळ्यात डोळे घालून फार काळ पाहायचं सुद्धा नाही. इति ती आख्यायिका/ दंतकथा.

गाडीत बसल्यापासून त्यामुळे साहजिकच आम्ही प्रचंड उत्साहित होतो. कुतूहल आणि गूढ उकलण्याची चळवळ डोक्यात सुरु होती. अश्यातच आम्ही साधारणपणे अर्ध्या तासाच्या दौडीनंतर तवांग मागे टाकले. आणि सुदैवाने वाटेत कोसळलेल्या एका दरडीमधून वाट काढून केवळ दैवावर स्वार होऊन झेमिथान्ग खोऱ्यात दाखल  झालो. दरड कोसळणे हा हिमालयीन भटकंतीतला  अपशकुन असतो. तुम्ही कितीही खडतर प्रवास करून आला असाल तरीही सर्व प्लॅन फाट्यावर मारून माघारी वळायला हा  प्रकार भाग पाडू  शकतो. सुदैवाने आम्ही त्यातून बचावलो. एका कठीण वळणावरुन आम्ही पार झालो व मुख्य झेमिथान्ग खोऱ्यात उतरलो.

तवांगपेक्षा इथला लँडस्केप जरा वेगळा होता. अजस्र् मोठ्या कड्यांवर सर्वत्र पसरलेली हिरवीकंच दुलई. लाखो लाखो ज्ञात अज्ञात वनस्पतीनीं  समृद्धघनदाट वनराजी. थंडगार वातावरण, दवं आणि जलकणांच्या सदैव पाझराने सर्वदूर जमिनीवर पसरलेली मृदुकनांना लगडलेली शेवाळाची झालर.जर्दनिळ्या आकाशात चाललेला ढगांचा सदैव पाठशिवणीचा खेळ. व दुतर्फा डोंगरकड्यांना लगडलेली स्वयंपूर्ण खेडी. खेडी जी विशुद्ध हवामानात जगणारी, निसर्गास पूरक वागणूक ठेवणारी. काहीशी अलिप्त आणि जरा मुख्य प्रवाहात येण्याच्या विवंचनेत असलेली. अत्तिशय दुर्गम पण देखणा प्रदेश.भूतान, चीन व भारत ह्या तीन देशांच्या एका कोपऱ्यात दडून बसलेला. सारंकाही विलक्षण आहे. इथे डोळे विस्फारायला लावणारा निसर्ग आणि लोकजीवन दोहोंच्या प्रेमात पाडणारा.एका आटोपशीर हॉटेलमध्ये डाळभात खाऊन झाल्यावर गाडीत बसलो. खिडकीच्या काचांमधून भावंतालच सौंदर्य न्याहाळत असतानाच रस्त्यालगत एका प्रचंड मोठ्या कड्यावरून कोसळणारा धबधबा नजरेस पडला. गाड्या थांबवल्या. खळाळत्या नदीपात्रात कोसळणारा प्रपोत त्याची पलीकडून अलीकडेपर्यंत ऐकू येणारी व पाषाणांसोबची आदळआपट पाहताना ऐकत ऐकत आम्ही आपली कड्यावरून सोडून दिली. पाचेक हजार फोटोज काढून गाडीत जाऊन बसलो.

मजल दरमजल, असंख्य नागमोडी वळणे अरुंद रस्ते वाड्यावस्त्यांतून जाणारा घाटाच्या अगदी तळाला  पोहोचला व पुन्हा समोर चढण दिसू लागली. तेथे प्रिन्सने गाडी थांबवली. डाव्या हाताला एक अद्भुत प्राचीन काळातला पिरॅमिडसारखा स्तूप. पांढरेशुभ्र रंगकाम. अष्टकोनी चौथऱ्यावर, गोलाकार डोम त्यावर चौकोनी खोली व दोन दिशांना रंगवलेले बोलके डोळे व कुंडलिनी घातलेल्या सापांची नक्षीव माथ्यावर चौकोनी कळस हंसी वैशिष्ट्यपूर्ण रचना. गॉर्सम चॉर्टेन असं ह्या जागेच नाव. बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात कुठल्यातरी लामा पार्थर यांच्या स्वप्नात येऊन देवदूताने  दिला. की चारही दिशांनी जिथे पर्वताची शिखरे निघालेली असतील, वाऱ्याची झुळूक एकाच दिशेने येईल , खळाळत्या पाण्याचा प्रवाह सहजपणे काठी डोंगरझाडी असेल आज वर निरभ आकाशाच छत्र व लख्ख सूर्यप्रकाश असेल तिथे नेपाळच्या बोधी नाथ स्तुपाच्या धर्तीवर आणखी एक नवा स्तुप बनवण्याचा आदेश दिला गोरसम चोरटेन ही सदय जागा ह्या वर्णनाप्रमाणे सर्वार्थाने आदर्श असल्याने त्यानीं निवडली आता प्रतिकृती कशा आधारे बनवायची म्हणून नेपाळहून स्केल मॉडेल एका मुळ्यावर कोरून आणायचा ठरला पण  आणताना एक गडबड झाली. प्रवासात  त्यातली आर्द्रता कमी झाल्याने हरेक कंदमुळाच्या गुणधर्माप्रमाणे तो सुकला. व प्रतिकृती हलकीशी तिरपी तिरपी झाली. त्यामुळे जेव्हा हा स्तूप पुरा झाला तोही हलकासा तिरपा झाला. बारीक  निरीक्षण केल्यास हे जाणवू शकते. डोंगरावर एका कपारीला लामांची समाधी सुद्धा आहे. वरून कशालाच स्तूप व स्वर्गीय भवतालच्या नजारा  दिसतो. मन शांत होते. चित्त प्रसन्न होते. ह्या स्तूपाला प्रदक्षिणा मारता मारता भूमिपुत्र प्रिन्स सोबत साधक बाधक चर्चा करता आली. बौद्ध धर्माची मूल्ये, शिकवण व आचरण लामांची निवड कार्य व निर्वाण झाल्यानंतर करावयाचे अंत्यसंस्कार, मोनपा सांस्कृतिकचे अंतरंग व अरुणाचल विषयी भारत सरकारने केलेले काम ह्या विषयावर त्याच्यासोबत वादविवाद घालायला मजा आली. ज्ञानात मौलिक भर पडली. संस्कृतीपासून दूर जाऊ पाहणारी त्याच्यासोबतची समवयीन तरुणाई पाहून त्याची होत असलेली घालमेल पाहून त्याहून बरं वाटलं. अश्याच तरुणांची, विवेकी मुलांची देशाला गरज आहे. आणि सीमाभागातल्या लोकवस्तीत तर त्याहून जास्तच. प्रिन्सला खूप खूप शुभेच्छा. सूर्याची किरणे तिरपी होऊन अंगावर येत होती. पोरं खच्चून फोटोबाजी करत होती. झेमिथान्ग पास ला काही वेगळ्या कारणांमुळे आर्मीने जाऊन दिलं  नाही. वर ड्रॉयव्हर्सला तंबीही भरली. पण असो.

ड्रॉयव्हर्सला तंबी भरली. पण असो. एका घाटाच्या टोकावर पोहोचलो. तारादेवीच्या विशाल मूर्तीसमोर  उतरलो. मूर्तीखालच्या छोटेखानी मठात लामा व बाहेरच्या हिरवळीवर कोवळ्या उन्हात गावकरी पोथीपठण अन काही मंत्रोच्चारण आळवत बसलेले. स्पिकर्सच्या  साह्याने त्यांनी तो आवाज ते साऱ्या खोऱ्यात पसरवत होते. अध्यात्मिक वातावरणात घालवलेले तेही क्षण केवळ अफलातून. देवळाबाहेर आलो तेव्हा अंगणात पडलेल्या गुंड्याला पोरं झटली. सगळ्या  महारथींनीं  प्रयत्न केला पण गुंडा  गुढग्याच्या वर कोणाला जाईना. शैलेश व निलेशने तो त्यातल्या त्यात कमरेपर्यंत उचलला. टोळक्याची इज्जत राखली. कारण मोनपा गडी प्रिन्सने तो छातीपर्यंत पेलला व काल जरा जास्तच झाली म्हणून नाहीतर मागे टाकला असता असं म्हणून आम्हाला खिजवलं. असो.

तवांग मुक्कामाकडे काळोख्या रात्री आम्ही मार्गस्थ झालो. वाटेत पुण्याला गेल्यावर महिन्यातून एकदा भेटायचं. टेक्निकल नॉलेज शेअर करायचं. असा निर्धार केला. पण त्या टेक्निकल कट्ट्याचा एकही अंक आज मी हे लिहितोय तोपर्यंत तरी झालेला नाहीये ही वेगळी गोष्ट! मधल्या काळात सुनीलने एक संकल्प सोडला. ‘तोंडाला रक्त लागल्याशिवाय मी तवांग सोडनार न्हाई!’ हॉटेलवर जाऊन संदीप व त्याने किचनचा ताबा घेतला. आडगावला जाऊन चिकन आणलं.झणझणीत बेत केला. आळणी खाऊन कंटाळलेले कार्यकर्ते तुटून पडले. भरल्या पोटावर हात फिरवून सर्वांनी जोडगोळीला आशीर्वाद दिले व अंथरून गाठलं. पडल्यावर फक्त एकच विचार डोक्यात फिरत होता. कि विलक्षण सौंदर्याने व देखण्या लोकांनी भरलेल्या ह्या खोऱ्याबद्दल अशी दंतकथेची भीती का बरं उडवली असेल? व अश्या स्वयंपूर्ण खेड्यातलं जीवनमानदेखील कित्ती आव्हानात्मक असेल? तवांग  मुक्कामातल्या शेवटच्या रात्री ह्या विचारातच डोळा लागला.

झ्यांग फॉल, जसवंतगढ आणि परतीचा कठीण प्रवास
सातच्या ठोक्याला जाग आली. तवांग सोडायची वेळ झालेली. बाजारपेठेतल्या पताकांनी सजवलेली रस्त्याखालून जाऊन आलो जमेल तेवढी ऊर्जा जमा केली. ह्या देखण्या शहराचं गरुड पुढचे अनेक दिवस असणारच होता. आवराआवर करून सर्व जण गाडीत बसलो. उदार मनाच्या हॉटेल मालकाने पुढच्या प्रवासाला शुभे म्हणून काही रेफ्रेशमेंट्स गाडीत भरली तेव्हा भरल्या मानाने पण तितक्यच जड अंतकरणाने त्याला व तवांगला अलविदा केला. गावाबाहेर पडलो. काही वेळात गाडी एका कड्यलागत पायऱ्याच्या मार्गाजवळ उभी राहिली खाली उतरून गेलो समोरच्या अजस्त्र कड्यवरुन झ्यांग फॉल कोसळत होता गावापाल्यडून वाहत येणारा तवांग नदीचा प्रवाह त्याच्या अर्धंदानाने अजुन रुंदावताना स्पष्ट जाणवत होता प्रचंड मोठ्या खडकावर पडून अनंत तुषार चांगले पन्नासेक मीटरवर पिस्कारले जाऊन इंद्रधनुष्य नजरेस पडत होता जणू वाट बांधलेल्या फिकट होत चाललेल्या प्रार्थनाध्वजांची माया प्रवाहात मिसळून त्या सप्तरंगी उधळणीची खरंच निसर्ग किती अगाध आहे.

धबधब्याच्या शक्य तितक्या जवळ गेलो म्हणजे किती तर पन्नास मीटरपर्यंत. तेवढ्यातच तुषारांमध्ये चिंब झालो. मनभर तो नजारा  नजरेत साठवून वर आलो. एक विद्युतनिर्मिती यंत्रणाही तिकडे सरकारने बनवून ठेवलीये. छान आहे तोही प्रकार.. स्थितिज ऊर्जा कुठेही मिळेना वाया नाही गेली पाहिजे. टर्बाइन्समध्ये डोकावून आलो व पुढच्या प्रवासाला लागलो. पुढचा थांबा होता जसवंतगड युद्धस्मारकाजवळ. गाडीतून उतरल्याबरोब्बर सगळ्यात पाहिलं काय पाहिलं असेल तर ते म्हणजे आर्मीच कॅन्टीन. मेन्युफलकावर चक्क इडली डोसा हे पदार्थ दिसले. मग काय? तुंबळ युध्द्व झाले. इडल्यांचा, अदरक मारके चहासोबत फडशा पाडला. जोडीला खाली अफाट खोल दरीचा नजारा  होताच. मग भरल्यापोटी मंडळी युद्धपट  समजून घ्यायला स्मारकामध्ये शिरली.

जसवंत बाबा ह्या रायफलमॅनने तीनशे चिन्यांना ह्याच पर्वतावरून यमसदनी धाडलं. जिथे तिथे चकमकीत कुणीही ठार झाला त्या सर्व जागा आर्मीने मार्क करून ठेवल्या आहेत. युद्धात जसवंत बाबा हुतात्मा झाले पण त्यांच्या पराक्रमापुढे दिपून गेलेल्या चिनी सैन्याने त्यांचा मृतदेह सन्मानाने सुपूर्द केला. ज्या चिनी सैन्याने येथे प्राण वेचले त्यांचीही समाधी येथे सेनेने बांधून ठेवलीये. जसवंत बाबांच्या मूर्तीसमोर जाऊन सर्वजण नतमस्तक झालो आणि निघालो. आणि संदेसे आते है च्या एकमुखी गजरात पुढची औपचारिक चढण पूर्ण केली. दुपारच्या उन्हात चकाकणारा सेला तलाव दिसत होता. पण मनात फक्त १९६२ चा युद्धपट  तरळतोय अशी परिस्तिथी झालेली. इथल्या वातावरणातच बलिदानाचा जाज्वल्य राष्ट्रभक्तीचा गंध आहे. व देशाच्या सीमा तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात हा संदेशही त्यात आहे. तो बघायला अनुभवायला सर्वांनी जावं म्हणून हा अल्प स्वल्प लेखनप्रपंच.

संध्याकाळी एकोणीस संख्या, दोन गाड्या व प्रत्येक ठिकाणी रेंगाळल्याने झालेला उशीर त्यामुळे ड्रायव्हरने रात्री  मुक्कामाचीऑर्डर काढलेली. त्यामुळे मग रात्री आठेकच्या सुमारास काहीतरी जेवायला घालून त्याने गाडी एका शासकीय गेस्टहाऊस समोर थांबवली. सकाळी उठून वेळ वाया घालवायचा नव्हता. त्यामुळे सामान गाडीवरचा ठेऊन आम्ही रूममध्ये फक्त झोपायला गेलो. औपचारिक समारोपाचा कार्यक्रम म्हणून प्रवासातल्या चांगल्या वाईट अनुभव व सूचना असा विषय घेऊन कट्टा भरवला. सर्वांना बोलायची सक्ती होती.पण न लाजता सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

पहाटे पाचला  गेस्टहाऊस  सोडलं आणि दुपारी ड्रायव्हरशी  हुज्जत घालून आम्ही त्याला कामाख्याला ड्रॉप करायला लावलं. टपावरची ओझी पाठीवर आली आणि व जो एकदा येतो त्याला इथे पुन्हा एकदा यावं लागत ही आख्यायिका खरी करायला म्हणून कि काय कामाख्या मातेचं दर्शन घेतलं. व ट्रेनमध्ये जाऊन पडी टाकली. पुढील पन्नासतास श्रमपरिहार झाला. पणसगळ्यांचा अवतार पाहून सहप्रवासी आम्हाला सैनिकच समजत  असावेत. त्यांच्या आदरभाववाल्या नजरांमधून दुसऱ्या दिवशी नाशिक जंक्शन ला उतरल्यावर सुटका होईल असं वाटत होतं. पण नाशिकच्या प्लॅटफॉर्मवर उतरलो तेव्हा मम्मीसोबत अण्णा आणि त्यांची टीम पोलिसी गणवेशात स्वागताला उभी.. अजूनच पंचाईत. कॅन्टीनमध्ये चमचमीत पुलावाचा पाहुणचार झाला.. आणि पुण्याची बस धरली. गुरुदेव धाब्यावर बस थांबली. चहाचे काप हातात धरून मंडळी चहाचे घोट घेताना तवांगचे किस्से बाहेर काढत होते. हास्याची कारंजी उडत होती. हे क्षण कधीही न विसरणारे. तवांग  सहलीची आठवण जेव्हाही येईल.. कितीही धुराळा बसला तरी ती पहाटेच्या दवाइतकी प्रसन्न करून जाईल. ताजी वाटेल एवढं नक्की!

ॐ मणि पद्मे हूँ !
ऋषिकेश काकडे
७८७५३५३१३९

इव्हेंट बॅनर: ‘एक दिवाळी सैनिकांसोबत’ अल्टिमेट हायकर्स अँड ट्रॅव्हलर्स सदर प्रवास हा फक्त एक सहलमात्र नसून ‘एक दिवाळी सैनिकांसोबत’ ह्या कार्यक्रमाचा भाग होता. सीमा भागात तैनात असलेल्या आपल्या वीर जवानांसोबत दिवाळी सणाच्या निमित्त थेट सीमेवर जाऊन संवाद साधणे, नागरिकांकडून/शाळकरी मुलांकडून बनवून घेतलेली शुभेच्छापत्रे त्यांच्यापर्यंत बायहॅन्ड पोहोचवणे, व सीमाभागातील बांधवांचं  जीवनमान समजून घेणे, जमल्यास त्यांच्याशी ऋणानुबंध जोडणे, शक्य झाल्यास काही मदत व इत्यादी गोष्टी करत नॅशनल इंटिग्रिटी ला हातभार लावणे ही साधारणपणे कार्यक्रमाची रूपरेषा..
सहभागी भिडू: विषांत वचकल (लीड), योगेश आलेकरी(लीड),रोहित तुपे, वैभव बांदल, अमोल निम्हण, राहुल मानकुंबरे, संतोष जुगदर (शाहीर), संदीप दळवी, शैलेश कदम, आशुतोष दळवी, महेश मींड, गौरव आमले,  तुषार दुधाने (मंडळाचे खजिनदार), सुधीर उकांडे , दत्तात्रय तोंडे, निलेश आलेकरी, चेतन बांदल, ऋषिकेश काकडे, सुनील जाधव
दिनांक: २८ ऑक्टॉबर ते ५ नोव्हेंबर  २०१९ 
मुक्काम: हॉटेल बुमला इनश्रेणी: कठीणउंची:-१५२०० फूटमार्ग: पुणे-मुंबई-गुवाहाटी-तवांग-(बूम ला,झेमिथान्ग)-तवांग-गुवाहाटी-नाशिक-पुणेभेटीसाठी उत्तम काळ:  मे  ते नोव्हेंबर

महत्वाच्या गोष्टीI.L.P.  किंवा  इनर लाईन परमिट(ऑनलाईन उपलब्ध. I.L.P. शिवाय अरुणाचलमध्ये प्रवेश निषिद्ध),आधार कार्ड/पॅनकार्ड/पासपोर्ट आदी ओळखपत्रे, उबदार कपडे, सद्य स्थितीला atm सुविधा मर्यादित आहेत. त्यामुळे सोबत पुरेशी रोकड(कॅश)बाळगणं सोयीस्कर. दमदार शारीरिक-मानसिक फिटनेस आणि भरपूर संयम व उत्साह..
तळटीप: अरुणाचल प्रदेश थक्क करू शकणाऱ्या अनेक गोष्टींनी समृद्ध राज्य आहे. पण संपूर्ण प्रवास हा डोंगराळ भागांतून, महाकठीण व बऱ्याचदा खराब रस्त्यावरूनच दीर्घकाळ करावा लागतो. जेवनाबाबत फार चोखंदळपणा केल्यास उपासमार होऊ शकते. सार्वजनिक शिस्तीचे पालन करून स्थानिकांसोबत जबाबदारीने वागावे. सीमांत भाग व सदर राज्यात मिलिटरीचं वर्चस्व असल्याने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने शिस्तीला सर्वोच्च प्राध्यान आहे. त्यामुळे त्यानुरुप आचरण राखावे. व इतरही अनेक कारणांमुळे सर्व बाजूंनी पुरेपूर अभ्यास केल्यावरच ह्या भागात भटकंतीस वळावे.